24.8 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

पाकमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले. पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या दहशतवादी हल्ल्यात एकूण १६ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दरबान पोलिस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी प्रथम स्फोटकांनी भरलेले वाहन पोलिस स्टेशनच्या इमारतीत घुसवले, त्यानंतर मोर्टार हल्ला करत ब्लास्ट घडवून आणला. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात किमान चार सुरक्षा कर्मचारी मृत्यूमुखे पडले तर १६ जण जखमी झाले. या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांनाही ठार केल्याची माहिती खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी दिली आहे.

उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांची संख्या किती होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. परिसरातील नागरिकांना सतर्क करून तातडीने कारवाई सुरू करण्यात आली, ज्यामध्ये दोन दहशतवादी तिथे ठार झाले.

शाळा, महाविद्यालये बंद
दहशतवादी हल्ल्यानंतर नवीन पोलिस तुकडी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली. दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR