इस्लामाबाद : वृत्तसंस्था
भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये या वर्षाच्या अखेरीस पॉलिमर प्लास्टिकपासून बनवलेल्या नवीन नोटा चलनात येणार आहेत. सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तान प्रयोगाचा एक भाग म्हणून नवीन पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी इस्लामाबादमधील बँकिंग आणि वित्तविषयक सिनेट समितीला सांगितले की, या वर्षी डिसेंबरपर्यंत सर्व कागदी चलनी नोटा नवीन वैशिष्ट्यांसह पुन्हा डिझाइन केल्या जात आहेत. अहमद म्हणाले की, १०, ५०, १००, ५००, १००० आणि ५००० रुपयांच्या नवीन डिझाईन केलेल्या बँक नोटा डिसेंबरमध्ये जारी केल्या जातील.
सध्या सुमारे ४० देश पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा वापरतात. या नोटांची बनावट कॉपी बनवणे कठीण आहे. पॉलिमर प्लास्टिकच्या नोटांध्ये होलोग्राम असणार आहे आणि या नोटा पारदर्शक असणार आहेत.
ऑस्ट्रेलिया हा १९९८ मध्ये पॉलिमर नोटा आणणारा पहिला देश होता. अहमद यांनी सांगितले की सेंट्रल बँकेची ५,००० रुपयांची नोट बंद करण्याची कोणतीही योजना नाही.