29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयनेपाळमार्गे भारतात घुसणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

नेपाळमार्गे भारतात घुसणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

लखनौ : उत्तर प्रदेश एटीएसने भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करणा-या तीन दहशतवाद्यांना युपी एटीएसने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये २ पाकिस्तानी आणि १ काश्मिरी दहशतवादी असून ते तिघही हिजबुल मुजाहिदीन आणि आएसआयशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे, यूपी एटीएसला काही दिवसांपूर्वीच या घुसखोरीची गुप्त माहिती मिळाली होती.

एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दोन पाकिस्तानी आणि एक काश्मिरी दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत होते. या तिघांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणही घेतले असून भारतात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. काही दिवसांपूर्वीच युपी एटीएसला ही माहिती मिळाली होती. दोन पाकिस्तानी व्यक्ती नेपाळमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गोरखपूर युनिटला देण्यात आली. यानंतर ३ एप्रिल रोजी एटीएसच्या गोरखपूर युनिटने नेपाळ भारत बॉर्डवरुन तीन आरोपींना अटक केली. मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अल्ताफ भट हा रावळपिंडी, पाकिस्तानचा रहिवासी आहे, सय्यद गझनफर हा इस्लामाबाद, पाकिस्तानचा रहिवासी आहे, तर नासिर अली हा जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरचा रहिवासी आहे.

आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध
तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर एटीएसने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २ मोबाईल फोन, २ मेमरी कार्ड, ३ पासपोर्ट, ७ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ३ आधार कार्ड, २ विमान तिकिटे, पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स, पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र, परदेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले. नेपाळ, बांगलादेश, भारत आणि अमेरिकेचे चलन जप्त करण्यात आले आहे. यूपी एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद अल्ताफ भट, सय्यद गझनफर आणि नासिर अली या तीन आरोपींचे फोटोही शेअर केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR