नवी दिल्ली : २०२१ साली तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सर्वात जास्त आनंदी पाकिस्तान झाला होता. इस्लामिक देश असल्याने पाकिस्तानला फायदा होण्याची आशा होती परंतु अवघ्या ३ वर्षात परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पाकिस्तान आणि तालिबानी राजवटीच्या अफगाणिस्तानाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चाललेत. तालिबान शेजारील राष्ट्र पाकिस्तानऐवजी दुस-या देशांसोबत संबंध बनवत आहे. सध्या तालिबानचा सर्वात मोठा मित्र म्हणून भारत पुढे येत आहे.
अलीकडेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांच्यासोबत दुबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर तालिबानने भारताला एक चांगला सहकारी असल्याचे म्हटले. त्याशिवाय तालिबान मंत्र्याने युएईचे मंत्री अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांचीही भेट घेतली. तालिबानने या भेटीतून पाकिस्तानाला दाखवून दिले की, इस्लामिक देशांमध्ये पाकिस्तानशिवायही त्याचे अनेक मित्र आहेत. त्याशिवाय भारत आणि तालिबान यांच्यात होणा-या बैठका धोकादायक आहेत. या बैठकीत टीटीपी आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानी एअर स्ट्राईकवर चर्चा झाली. भारताने इराणच्या चाबहार बंदर विकासावर मदतीचं आश्वासन दिले आहे. भारताला मॅनेज करणे आवश्यक आहे कारण पाकिस्तानबाबत त्यांचे धोरण आक्रमक आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या जमिनीवर एअर स्ट्राईक केले होते ज्यामुळे त्यांचे तालिबानशी संबंध खराब झाले आहेत. भारत काश्मीरवर चर्चा करू इच्छित नाही परंतु अफगाणिस्तानसोबत आपल्याला नवीन धोरण आखायला हवे असे पाकिस्तानी तज्ज्ञांनी म्हटले. दरम्यान, भारत अफगाणिस्तानात चीनचा वाढता प्रभाव कमकुवत करण्यासाठी तालिबानच्या जवळ जात आहे. टीटीपी आणि इस्लामिक स्टेट मिळून अफगाणिस्तानात गृहयुद्धाची परिस्थिती बनवू शकतात अशी भीती अफगाण तालिबान्यांना आहे. त्यासाठी ते टीटीपीविरोधात थेट एक्शन घेत नाहीत ज्यातून पाकिस्तानला संधी मिळेल. तालिबान केवळ आपले सरकार वाचवत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारताला हीच संधी आहे. त्यातच भारत जवळ आल्याने पाकिस्तानवर वचक ठेवता येईल त्यामुळे तालिबानही भारताशी जवळीक वाढवत आहे असे पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ नजम सेठी यांनी सांगितले.
जवळीक बनली डोकेदुखी
यूएई आणि सौदीला तालिबानने भेटणे पाकिस्तानसाठी चिंताजनक नाही परंतु भारत आणि तालिबान यांच्यातील जवळीक पाकिस्तानी तज्ज्ञांसाठी चिंतेची वाटते. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करतात त्याशिवाय पाकिस्तानला सतर्कतेचा इशारा देतात. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार जाण्यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे नाव येत आहे. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. तालिबानसोबत भारत सुरुवातीपासून संपर्कात आहे. ते मोफत गहु, औषधे आणि पोलिओ व्हॅक्सिन तालिबानला देतायेत असे पाकिस्तानी तज्ज्ञांनी सांगितले.