24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरयात्रेत विघ्न येऊ नये, पंच कमिटी सदस्यांनी घातलं साकड

यात्रेत विघ्न येऊ नये, पंच कमिटी सदस्यांनी घातलं साकड

सोलापूर : ग्रामदैवत यात्रेतील चार प्रमुख विधी अन् त्यानंतर जानेवारीअखेरपर्यंत चालणाऱ्या गड्डा मैदानावर कुठले विघ्न येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील अष्टविनायकाचे पूजन करून यात्रेचा श्रीगणेशा करण्यात आला. अष्टविनायक पूजन परिक्रमेला प्रारंभ झाला आणि दुपारपर्यंत ही परिक्रमा पूर्ण झाली. अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथील विरेश गणपतीच्या पूजनाने या अष्टविनायक पूजन परिक्रमेला सुरुवात झाली. अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आले. यावेळी गणराय व सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली.

वेदमूर्ती शिवयोगी शास्त्री होळीमठ आणि वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली झालेल्या या कार्यक्रमास देवस्थान पंच कमिटीचे सदस्य नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, काशीनाथ दर्गो पाटील, गिरीश गोरनळ्ळी, पशुपती माशाळ, प्रकाश बिराजदार, रतन रिक्के, सुधीर देशमुख यांच्यासह सिद्धाराम पाच्छापुरे, अमृत कोनापुरे, चंदन पाच्छापुरे, अशोक बिराजदार, राजेंद्र बनसोडे, विजयकुमार कंकरे, संजय चितळी, इष्टलिंगप्पा चितळी, सुरेश म्हेत्रे, विलास कारभारी हे उपस्थित होते.

या परिक्रमेतून पुढे आग्नेय दिशेला असलेल्या होटगी गावच्या हद्दीतील बेनक गणपतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रेवणसिद्धेश्वर मंदिरातील नंदीमहांकाळ गणपती, देगाव येथील करीगण गणपती, देशमुख मळा येथील वीरकर गणपतीचे पूजन झाले. भोगाव येथील वीर कोलाहल गणपतीचे व हिप्परगा गावात असलेल्या मश्रुम गणपतीचे पूजन करण्यात आले. सध्या शहरातील शिवानुभव मंगल कार्यालय स्थित अतिथी गणपतीचे पूजन झाले. मल्लिकार्जुन मंदिरातील गणेश पूजनाने सुरू झालेली ही परिक्रमा जवळपास पंच्याहत्तर किमीचा प्रवास करीत संपली.

सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत अडूसष्ट लिंगाची स्थापना केली. सोन्नलगी अर्थात सोलापूरवर कोणतही संकट अथवा अरिष्ट येऊ ऊ नये, येथील जनता सुखी समाधानी आणि आनंदी राहावी यासाठी सोलापूरच्या आठही दिशांना अष्टविनायकांची स्थापना करून, सोन्नलगी म्हणजेचं सोलापूरचं संरक्षण केलं. शहराच्या अष्टदिशेला स्थापन केलेल्या या अष्टविनायकांना मोठं महत्त्व आहे. अष्टविनायकामुळे आजवर सोलापूरवर कधीच नैसर्गिक संकट आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR