22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरविठुनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी

विठुनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
आज आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात माऊलीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे, मु. पो. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक) यांना महापूजेचा मान मिळाला.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात सलग तिस-यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव, राज्यातील बळिराजाचे दु:ख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी मागितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज सळीकडे भक्तीमय वातावरण झाले आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे. या राज्यातील बळिराजाला चांगले दिवस येऊ दे, त्यांचे पीक चांगले येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे, शेतक-यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असे मागणे विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस
हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिस-या वर्षी मला श्री विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा करण्याचे भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आपण सर्वजण वारक-यांची भगवी पताका फडकवत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

२० लाखांहून अधिक भाविक पंढरीत
संतांच्या पालख्या मंगळवारीच सायंकाळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. सध्या पंढरीत सुमारे २० लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त एसटी, रेल्वे, खासगी वाहनांसह पालख्या-दिंड्यांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR