पुणे : प्रतिनिधी
आपल्या संतानी लिहिलेलं धन ही महाराष्ट्राची जमेची बाजू आहे. वारकरी कशाचीही पर्वा न करता पिढ्यान्पिढ्या पंढरीच्या वारीसाठी माऊलींचे दर्शन घेऊन पंढरपूकडे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघतात. मीदेखील पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, पण कधीही गाजावाजा करीत नाही. हे काही जगाला सांगायची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने पुणे येथील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, हभप भारत महाराज जाधव आदी उपस्थित होते.
मी आस्तिक की नास्तिक याबाबत ब-याचदा बोलले जाते. मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर सगळ््या जगाला कळाले पाहिजे, असे काही नाही. मी प्रसिद्धीच्या भागात कधी पडत नसल्याचे शरद पवार म्हणाले. मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारले की, तुम्ही जाणार आहेत का? मी म्हणालो, हो जाणार आहे. काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली. पण हे जे लोक आहेत, पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
मी आज भाषण करायला नाही, ऐकायला आलो असल्याचे शरद पवार म्हणाले. आज महत्त्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे. तो समाज पुरोगामी पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. वारकरी संप्रदाय म्हणून काम करणारे अनेक लोक आहेत. त्यांचे विचार ऐकण्याची अनेक वेळा संधी येते. ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात, धर्म बघून भूमिका घेतात, असेही पवार म्हणाले.
समाजाचा विकास करणारा विचार करणारी लोक आज सुद्धा आहेत. चुकीच्या प्रवृत्तीलाआळा घालण्याचा प्रयत्न आपण करु शकतो. अध्यात्मिक आघाडी महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांचे विचार आपण ऐकले. तुकाराम महाराज यांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडल्याचे शरद पवार म्हणाले.
पांडुरंगाच्या नावे व्यवसाय करणा-यांना मानत नाही
वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे. पांडुरंगाच्या नावाने व्यवसाय करणा-या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही, असेही शरद पवार म्हणाले.