27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडे

पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडे

पुण्यातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडे

पुणे : विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली असून पुणे लोकसभा मतदारसंघात येणा-या सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानसभेच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन पुण्यात काय होणार याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. खासदारांची संख्या २३ वरून ९ वर आली आहे. भाजपचे आमदार असणा-या अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेत चांगले मताधिक्य मिळाल्याने आमदारांसह नेत्यांचीही चिंता वाढली आहे.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन होईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपने काम सुरु केले आहे. यासाठी भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेची जबाबदारी दिली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे शिवाजीनगर, वडगाव शेरी, कोथरूड या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर बारामतीमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघही मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. मोहोळ यांनी कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली आहे. तर मुंडे यांच्या बैठका पुढील काही दिवसात होणार आहेत.

या बैठकांमध्ये भाजपची बुथनिहाय स्थिती काय आहे?, लोकसभा निवडणुकीत कोणत्या बुथवर किती मताधिक्य मिळाले, कुठे पिछाडी होती, त्यामागची कारणे काय आहेत याचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक पदाधिका-यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेऊन त्याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणे अपेक्षित आहे. त्यावरून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. दरम्यान मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत कसबा आणि पर्वतीमध्ये जे मताधिक्य मिळाले त्यावर विसंबून राहू नका, आपण हवेत राहिल्यास त्याचा फटाका बसू शकतो. आतापासूनच सतर्क रहा, व्यवस्थित नियोजन करा लोकसभा निवडणुकीत आपली ऐनवेळी पळापळ झाली होती अशा शब्दात कान टोचल्याचे भाजपमधील काही पदाधिका-यांनी सांगितले.

प्रदेश भाजपने पुणे लोकसभेतील मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि पंकजा मुंडे यांच्याकडे दिली आहे. त्यानुसार मोहोळ यांनी कसबा व पर्वती या दोन मतदारसंघाची बैठक घेतली आहे. या दोन्ही नेत्यांचे प्रवास पुढील काही दिवसात पूर्ण होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR