मुंबई : प्रतिनिधी
गाड्यांची नोंदणी करताना आधी पार्किंगची सुविधा असावी, असा सरकारचा नवा विचार सध्या चर्चेत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधील पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडीचा विचार करता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबई, पुणे आणि मेट्रो सिटीत आधीच जागेची वानवा असताना केवळ पार्किंगला जागा नसल्याने एखाद्याला कार खरेदी करता येणार नाही, हे योग्य नसल्याची अनेकांची भावना आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये पार्किंग ही मोठी समस्या झाली आहे. पार्किंगच्या जागेअभावी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वाद वाढत आहेत. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीच्या घरात, कॉलनीत कार पार्किंगची जागा आहे, त्याच व्यक्तीला कार खरेदी करण्याचा अधिकार असणार आहे.
त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे संबंधित ग्राहकाने देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे, जर घराच्या जागेत पार्किंगची सोय नसेल तर कार खरेदी करता येणार नाही. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३० डिसेंबरला सादर झाला. याला विरोधकांनी विरोध केला आहे.