पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा नसून तो अजित पवारांचा असल्याचे आपल्या निकालात म्हटले.
सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे या सध्या पुणे दौ-यावर आहेत.
अजित पवार म्हणाले होते की, संसदपटू होऊन, भाषणं करून विकासकामं होत नसतात. त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत म्हटले की, केवळ संसदेत आम्ही भाषण करत नाही तर त्याद्वारे लोकांचे प्रश्न मांडत असतो. भाषण करण्यासाठीच संसदेत आम्ही जातो. यावेळी त्यांनी बारामतीच्या जनतेला धन्यवाद देत, आवाहनही केले आहे. माझे मेरिट बघून मला पास करा, असे त्या म्हणाल्या.
सेल्फीचं प्रमोशन हे पंतप्रधान करतात
सेल्फी काढून विकासकामे होत नाहीत, असा टोलाही अजित पवारांनी सुळेंना लगावला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, शिक्षण विभागाने एक जीआर देशासाठी काढला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एक सेल्फी पॉईंट पंतप्रधान मोदींसोबत उभारा, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना सांगितले होते. सगळीकडे स्टेशनपासून ते कॉलेजपर्यंत मोदींचे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सेल्फीचं प्रमोशन आम्ही नाही तर या देशाचे पंतप्रधान करत आहेत.
राजकारण भातुकलीचा खेळ नाही
राजकारण हा काही भातुकलीचा खेळ नसतो. त्यात नाती नसतात तर जबाबदारी असते. नाती ही प्रेमाची असतात आणि मी नाती आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही. माझी लढाई ही वैयक्तिक नाही, माझी लढाई वैचारिक आहे. भाजपाच्या चुकीच्या निर्यणांविरोधत मी लढत आहे. त्यामुळे जे कोणी भाजपाची विचारधारा घेऊन माझ्यासमोर निवडणूक लढवेल, त्याच्याशी माझी विचारांची लढाई असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ताईंचे दादांना सडेतोड उत्तर
संसद ही एक इमारत नाही, तर आमच्यासाठी एक लोकशाहीचं मंदिर आहे. जेव्हा पंतप्रधान निवडून आले तेव्हा ते ही संसदेत नतमस्तक झाले होते. त्यामुळे केवळ संसदेत आम्ही भाषण करत नाही, तर त्याद्वारे लोकांचे प्रश्न मांडत असतो. भाषण करण्यासाठी संसदेत आम्ही जातो, असे म्हणत त्यांनी दादांना प्रत्युत्तर दिले आहे.