नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला असून सातवेळा एका महिलेने अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. मोदी ३.० काळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प होता. लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देश याकडे लक्ष ठेवून होता. ग्रामविकासाठी सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्रामविकासासाठी २.६६ लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ग्रामविकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ३ कोटी घरे बांधण्यात येतील असे सीतारमण यांनी सांगितले. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, मी यावर्षी ग्रामविकास आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांसाठी २.६६ लाख रुपयांची तरतूद करत आहे. सीतारमण यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. २५ हजार ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचा सरकारचा इरादा आहे.
गावांच्या संख्येत वाढ
अनेक गावांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. अशा २५ हजार गावांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा राबवला जाणार आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये देखील पक्का रस्ता पोहोचेल आणि लोकांना सुविधा मिळायला लागतील, असे त्या म्हणाल्या.
उन्नत ग्राम अभियान सुरू करणार
आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या सुधारणेसाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु केले जात आहे. ही योजना आदिवासी बहुल गावांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेच्या माद्यमातून ६३ हजार गावांना सामाविष्ट करून घेतले जाईल. यामुळे ५ कोटी आदिवासींना लाभ मिळेल असा दावा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.