मुंबई : प्रतिनिधी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज विधान भवनाच्या पाय-यावर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पाय-यावर प्रचंड गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. विरोधकांनी विधान भवनाच्या पाय-यावर गोंधळ घालून अधिवेशनात सरकारला कसे आणि किती धारेवर धरले जाईल याचे संकेतच दिले आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘शेतकरीविरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यांवर जोरदार निदर्शने केली. यावेळी अनिल देशमुख आणि भाई जगतापही उपस्थित होते.
वीज बिल माफ करा
शेतक-यांचे वीज बिल माफ केले पाहिजे, शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळिराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतक-यांना कोण देणार धीर, शेतकरीविरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत टक्केवारी सरकार हाय हाय, शेतक-यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतक-यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या सरकारने शेतक-यांना फसवले आहे. शेतक-यांना अनुदान दिले नाही, कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
विरोधकांच्या घोषणा काय?
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बळिराजाचा बळी जात आहे. मंत्री सुखी, शेतकरी दु:खी, टक्केवारी सरकार, चोर सरकार आणि ४० टक्के सरकार हाय हाय.. अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. त्यामुळे संपूर्ण विधान भवन परिसर दणाणून गेला.
उद्धव ठाकरे येताच पेढे वाटप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज विधान भवनात आले. उद्धव ठाकरे विधान भवन परिसरात येताच विरोधकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अंबादास दानवे आणि शिवसैनिकांनी पेढे वाटप केले. उद्धव ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे विरोधकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.