छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका जाहिरातीत माजी खासदार इम्तियाज जलील आणि जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचे फोटो असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली. त्यानंतर एका वृत्तपत्रात अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जाहिरात दिली. मात्र, या जाहिरातीत माजी खासदार इम्तियाज जलील आणि जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांचे फोटो असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा रंगली आहे. त्यातच या प्रकाराची मंत्री अतुल सावे यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.
या जाहिरातींवरून मंत्री अतुल सावे हे चांगलेच संतापले आहेत. या प्रकारची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या छापलेल्या फोटोवरून अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांचा चांगलाच समाचार घेत पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही सांगितले.
दरम्यान, ज्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला त्यांचाच या जाहिरातीत फोटो लावला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
याची तक्रार आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.