नवी दिल्ली : सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात स्कॅम्स होत आहेत. स्कॅमर्स नवनवीन प्रकारांनी लोकांना गंडवत आहेत. अशातच एका नवीन प्रकारचा स्कॅम भारतात वाढत चालला आहे ‘पिग बुचरिंग’ असे या स्कॅमचे नाव आहे. याचा उगम चीनमध्ये झाला होता. ऑनलाईन ब्रोकरेज फर्म झेरोधाचे फाऊंडर नितीन कामथ यांनी याबाबत इशारा दिला आहे.
कामथ यांनी सांगितले, की स्कॅमर्स भारतीय ब्रोकरेज फर्मसारख्या दिसणा-या वेबसाईट्स तयार करत आहेत. या वेबसाईट्स फिशिंगसाठी तयार केल्या जातात. ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते. चिनी लोन ऍप्सनंतर आता चीन आणि अन्य आशियाई देशांमधील हा पिग बुचरिंग स्कॅम भारतात फोफावत आहे.
कित्येक देशांमध्ये पिग, म्हणजेच डुकराचे मांस आवडीने खाल्ले जाते. जेव्हा मांस मिळण्यासाठी म्हणून डुकरांना पाळले जाते, तेव्हा त्यांना खाऊ-पिऊ घालून आधी मोठे करतात. जेणेकरून भरपूर मांस मिळेल. अशाच प्रकारे या स्कॅममध्ये स्कॅमर्स आपल्या टार्गेटला मोठी रक्कम जिंकण्याचे आमिष देतात.
सुरुवातीला या टार्गेटला काही रक्कम जिंकू दिली जाते. रक्कम जिंकत गेल्यामुळे व्यक्तीचा हॅकर्सवर विश्वास बसतो, आणि ते मोठी रक्कम गुंतवतात. यानंतर हॅकर्स कोणताही ट्रेस न ठेवता गायब होतात, आणि मग या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं कळतं.
असा करा बचाव
या स्कॅमपासून बचावाचा उपाय म्हणजे अनोळखी मेसेजना रिप्लाय न करणे, आणि आमिष दाखवणा-या लिंक्सवर क्लिक न करणे. याव्यतिरिक्त प्ले-स्टोअर किंवा ऍप स्टोअर व्यतिरिक्त अन्य सोर्सवरून कोणतंही ट्रेडिंग ऍप डाऊनलोड न करणे. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत देखील अशा प्रकारचे स्कॅम होत आहेत.