मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता. लाडक्या बहिणी म्हणजे जणू गुलाम आहेत व १५०० रुपयांत बहिणींना गुलाम करण्याची योजना राबवली जात आहे, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. निवडणुका होईपर्यंत या राज्यात दोनेक महिने सगळेच लाडके होतील. या लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होत आहे व उद्या कर्मचा-यांचे पगारही करता येणार नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
‘लाडकी बहीण योजनेच्या प्रचार सभा राज्यात जागोजागी होत आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोंधळ होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री मिंधे हे महिलांना सारखे विचारत आहेत, पैसे मिळाले ना? मिळाले ना पैसे? पैसे मिळाले ना?’ यावर समोरच्या गर्दीतून एक महिला जोरात ओरडली, ‘‘होय होय, मिळाले. पैसे काय खोकेवाल्या सरकारच्या बापाचे आहेत काय?’’ महिलांच्या मनातला हा उद्रेक आहे’’, असे संजय राऊतांनी म्हटले.
इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता
‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार म्हणजे १५०० रुपयांत मते मागण्याचा जंगी कार्यक्रम, तोदेखील सरकारी पैशांनी सुरू आहे. त्यासाठी भव्य मंडप व मंच उभारले जात आहेत. प्रेक्षकगृहातील महिलांकडून मुख्यमंत्र्यांवर गुलाबी पाकळ्या उधळून घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या योजनेवरून इतका लाचार प्रकार कधी झाला नव्हता, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.