25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रकोण येईल यापेक्षा झाडे लावा सावली नक्की येईल

कोण येईल यापेक्षा झाडे लावा सावली नक्की येईल

कळंब : सतीश टोणगे
लोकसभा निवडणुका भर उन्हात पार पडल्या. उमेदवारांसह समर्थकांच्या अंगाची उन्हामुळे लाही लाही झाली. पण काय करणार प्रचार केल्याशिवाय भागतच नव्हते. प्रचारात रस्त्यावर कुठे थांबण्यासाठी डेरेदार झाडही सापडत नव्हते. प्रत्येक गावात पूर्वजांनी जोपासलेल्या झाडांची कत्तल झाली होती. खरे तर परवानगीशिवाय झाडे तोडू नयेत, असा कायदा असतानाही, या कायद्याला पायदळी तुडवत सर्रास झाडे तोडली जात आहेत. झाडाच्या जंगलाऐवजी सिमेंटची जंगले तयार होऊ लागली आहेत. नावालाच वनीकरण विभागाचे ‘झाडे लावा अभियान’ कागदावर दिसत आहे

. या झाडासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार अधिकारी करत आहेत, झाडे नसल्याने प्रदूषण वाढू लागले आहे. झाडांपासून मिळणारा मोफत ऑक्सिजन आता कोरोनापासून हजारो रुपये मोजून विकत घेण्याची गरज भासू लागली आहे. म्हणूनच लहान- मोठ्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी, पक्षांनी, ‘एक मत, एक झाड’ हे अभियान राबवणे महत्त्वाचे असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत चाळीस, पंचेचाळीस डिग्री तापमान होते. यावेळी सर्वांनाच झाडाच्या सावलीची किंमत कळाली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, येईल की राष्ट्रवादी.. यावर शर्ती लावल्या पण झाडे लावा यावर मात्र कुणीही बोलले नाही. कोण येणार हे महत्त्वाचे नसून ‘चार झाडे लावा म्हणजे सावली येईल’ अशी कुजबूज ज्येष्ठ नागरिक करत आहेत.

आता येणा-या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना ‘एक झाड – एक मतदान’ हे अभियान राबवून झाडे लावण्याची व ती जोपासण्याची विनंती करावी, त्यामुळे पुन्हा परिसर हरित होण्यास मदतच होईल. नाहीतर यावर्षी ‘अबकी बार ४५ डिग्री पार, अगली बार ५० डिग्री पार’ अशी चर्चा होऊ लागली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार जेवढ्या मतांनी विजयी होतील, तेवढी झाडे त्यांनी मतदारसंघात लावावीत, असा प्रस्ताव आता पुढे येऊ लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR