सोलापूर : प्रवाशांच्या हितासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. नवीन बस दाखल होताना प्रथमोपचार पेटी बसमध्येच असते. जसजशा बस जुन्या होत जातात, तसतशी प्रथमोपचार पेटी हद्दपार होत चालली आहे. या पेटीचा वापर आणि उपयोग किती, हा एक संशोधनाचा विषय ठरत असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणून प्रथमोपचार पेटी सुसज्ज असणे आबश्यक आहे. सोलापूर विभागातील नऊ आगारांमधून धावणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक बसमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
आपत्कालीन परिस्थितीत एस.टी. मध्ये प्रथमोपचार पेट्या बसमधून गायब झाल्या आहेत. एखादा अपघात झाल्यास तातडीने प्रथमोपचार मिळावेत म्हणून प्रत्येक एस.टी. बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविण्यात आली. अनेक दिवस या पेट्या सुरक्षित राहतात, नंतर मात्र खिळखिळ्या होतात. अनेकदा या पेट्यांतील औषधे गायब असतात. सोलापूर आगारामध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. चालक वाहकांनी सांगितलेली वस्तुस्थिती अधिक बोलकी आहे.एस.टी. बद्दल प्रवाशांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बसमध्ये प्रथमोपचार पेटीत औषधे व साहित्य जरी ठेवले तरी चोरीस जातात. प्रथमोपचार साहित्याच्या पेटीकडे कोण लक्ष देणार, अशी प्रतिक्रियादेखील व्यक्त होत आहे. प्रथमोपचार पेटीचा फार उपयोग होत नसल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर आगारातून पुणे, मुंबई, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, लातूर, तुळजापूरकडे खाना होतात. बसची पाहणी केली असता, बहुतांश बसमध्ये पेटी दिसून आली, पण त्यात कुठलेही औषध किंवा साहित्य नसल्याचे दिसून आले. वाहकाकडे विचारणा केली असता, प्रथमोपचार साहित्य वापरले गेल्याचे सांगण्यात आले. वर्षभरात या पेटीतील सर्व साहित्य आहे किंवा नाही याकडे अधिकारी लक्ष देतात की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बसमधील प्रवाशांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत, या उद्देशाने एस. टी. मध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या. चालकाच्या केविनमध्ये ही पेटी असते. त्यामध्ये मलम, कार्टन पट्टी, डेटॉल किंवा सॅव्हलॉन, अॅटिसेप्टिक क्रीम, पावडर, गुंडाळता येणारी पट्टी, जखमेवर बांधण्यासाठीची जाळीची पट्टी, कापूस, वेदनाशामक गोळ्या आणि औषधांचा अंतर्भाव असतो, मात्र एकाही बसमध्ये औषधे आढळली नाहीत.
अधिकारी म्हणतात, गाड्यांमध्ये पेट्या आहेत. बऱ्याच बसमध्ये आधी औषधांच्या पेट्याच दिसत नाहीत. एखाद्या बसमध्ये पेटी असेल तर त्यात औषधे नसतात. प्रथमोपचार पेटीबाबत सोलापूरच्या स्थानक प्रमुखांना विचारले असता त्यांनी गाड्धांमध्ये प्रथमोपचार पेट्या असतात, पेट्यांमध्ये साहित्यही असल्याचे सांगितले.