पूर्णा : धर्माबादहुन मनमाडकडे जाणा-या मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे इंजिन तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याची घटना दि.१२ रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास पूर्णा रेल्वे स्टेशन पासून जवळ असलेल्या बॉम्बे पुला नजीक घडली. चालक व लोकोपायलटच्या प्रयत्नानंतर इंजिन सुरू झाल्याने गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतू या सगळ्या गोष्टीसाठी जवळपास २ ते २.३० तासांचा वेळ लागल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागला.
मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेने असंख्य नोकरदार कार्यालयात जातात. या रेल्वेने सोमवारी अनेक विद्यार्थी सुद्धा परीक्षेसाठी जात होते. परंतू पुर्णेच्या पुढे रेल्वे इंजिन अचानक फेल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत कसे पोहचावे असा प्रश्न पडला. रेल्वे चालक व लोको पायलट यांच्या अथक परिश्रमानंतर रेल्वे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर गाडी परभणीकडे मार्गस्थ झाली. परंतू या सर्व प्रकारामुळे गाडीला जवळपास २.३० तास उशीर झाला. नांदेडचे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी रेल्वे इंजिन कोणत्या कारणाने बंद झाले याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.