पालघर : प्रतिनिधी
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा-या रणकोळ आश्रमशाळेतील २७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल श्रावणातील पहिला सोमवार होता. रात्री या विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर आश्रमशाळेतील सर्वजण झोपी गेले. मात्र, मंगळवारी पहाटे आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना मळमळ होऊ लागले. त्यानंतर २७ विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. या सगळ्यांना तातडीने नजीकच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, रणकोह आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींना रात्रीपासूनच त्रास जाणवत होता. त्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. त्यापैकी आठ विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत, तर २० विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर १० विद्यार्थिनींना ऐना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप भोये यांनी दिली.
डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणा-या कांबळगाव येथील सेंट्रल किचनमधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन शासन स्वत: चालवते. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.