मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना-मुंबई अशी संभाव्य पदयात्रा काढली आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान सर्व अधिकारी, अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्या आणि अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी जालना-मुंबई दरम्यान पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी २० जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्यांसह सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
यामध्ये वैद्यकीय रजा वगळण्यात आली आहे. साप्ताहिक सुट्या रद्द करताना शासन निर्णयाचे पालन करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले.