बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिस चांगलेच चर्चेत आले आहेत. नवे पोलिस अधीक्षक नवनीत कावंत यांनी सुत्रे हाती घेताच नवीन बदल केले आहेत. आता अवैध वाळू उपसा करणा-यांविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली आहे. आता वाळू माफियांना मदत करणा-या पोलिसांवर त्यांनी कारवाई केली आहे.
अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटेलोटे करणा-या बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर कारवाई केली आहे.
मिळालेली माहिती अशी सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलिस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते. पण तरीही वाळूसह वाहन ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला. ही गोष्टी गुन्हेगारांना मदत करण्यासारखी आहे. यावर आता पोलिस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.
बीड पोलिस चर्चेत
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड पोलिस पुन्हा चर्चेत आले आहेत. वाल्मीक कराड याने आतापर्यंत बीड जिल्ह्यात आपल्या मर्जीतील पोलीस कर्मचा-यांच्या परळीत बदल्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याने पोलिसांवर दबाव आणून अनेकांवर गुन्हा दाखल केल्याचाही आरोप सुरू आहे.