मुंबई : प्रतिनिधी
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर राज्यात महिलांसोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. पण यावर आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आले असून प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. दुसरीकडे मुलांच्या सुरक्षेसाठी शालेय विभागानेही आपल्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. तसेच, सर्व शाळांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलिस प्रशासन आणि बालहक्क संघटनेलाही समन्वय साधण्याच्या सूचना केल्या आहेत. अशामध्ये मुंबई पोलिसांनीदेखील काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील प्रत्येक विभागामधील शाळांना पोलिस भेट देणार असून तेथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांचा आढावा पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी शाळांना पत्रंही दिली जाणार आहेत. मुख्याध्यापकांसह संस्थेलाही विद्यार्थी सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी? हे सांगत सतर्कचे निर्देशही दिले जात आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये तक्रारपेट्या असाव्यात तसेच सखी सावित्री समिती असावी अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण, याची अंमलबजावणी होते का? यावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. बदलापूर प्रकरणानंतर मुंबईतील शिक्षणाधिका-यांनी आपल्या विभागातील शाळांना पत्र पाठवून सुरक्षिततेबद्दल माहिती मागवली. प्रत्येक पोलिस ठाण्याकडून त्यांच्या हद्दीमध्ये येत असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सूचना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूचनांची पूर्तता करण्याबाबत समज दिली जात असून अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळल्यास त्याला शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.