मुंबई : प्रतिनिधी
रेल्वेने दादरचे ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. ‘एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, अशी टीका त्यांनी केली होती. तर हिंदू मत मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचे भाजपने प्रत्युत्तर दिले. तर आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाकडून दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. आमदार रवी राणा देखील हनुमान मंदिरात जाणार असल्याने राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आज दादरच्या हनुमान मंदिरात सायंकाळी महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे , शिवसेना नेते, मी, स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक त्या आरतीला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर हिंदू म्हणून भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी आरतीला यावे. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला आहे.
एकीकडे साडे पाच वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हनुमान मंदिरात महाआरती होणार असताना आमदार रवी राणा हे देखील तिथे जाणार आहे.
आमदार रवी राणा मुंबईत
आमदार रवी राणा यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे कोणतेही मंदिर तुटणार नाही, असा विश्वास पोस्टद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. तर आमदार रवी राणा आज मुंबईत दादरच्या हनुमान मंदिरात दर्शनाला जाणार, असे देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
तर दुसरीकडे दादरच्या हनुमान मंदिरात भाजप नेते किरीट सोमय्या दर्शनाला जात आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटावर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते हिंदुत्त्वाचा मुद्दा घेत आहेत. ज्यांनी हनुमान चालिसा वाचणा-यांना जेलमध्ये टाकले त्यांना हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे. महापालिकेत त्यांना हिंदुत्वाचा भगवा झेंडा आठवत आहे. असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.