21.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरने चोराला सोडण्यासाठी डीसीपीवर टाकला होता दबाव

पूजा खेडकरने चोराला सोडण्यासाठी डीसीपीवर टाकला होता दबाव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. प्रोबेशनर आयएएस अधिकारी पूजा खेडकरने आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात येत आहे. चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी खेडकरने डीसीपी दर्जाच्या अधिका-यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.

यासह पुण्यात राहत असताना पूजा खेडकर वापरत असलेल्या खासगी ऑडी कारवर २१ वेळा चालान झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे की, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिका-यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब १८ मेची असल्याचे सांगण्यात येत आहे. ईश्वर उत्तरवाडे याला पनवेल पोलिसांनी चोरीच्या एका प्रकरणात अटक केली होती. यावर खेडकर यांनी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना फोन करून उत्तरवाडे यांना सोडण्यास सांगितले होते. ईश्वर उत्तरवाडे निर्दोष असून त्याच्यावरील आरोप किरकोळ असल्याचे खेडकर यांनी डीसीपींना सांगितले असल्याचे एका अधिका-याने सांगितले. पानसरे यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात खेडकरने आयएएस अधिकारी असल्याची ओळख करून दिली होती. तथापि, डीसीपींना खात्री नव्हती की कॉल करणारी महिला खरोखरच आयएएस अधिकारी आहे की नाही.

ते पुढे म्हणाले की, नवी मुंबई पोलिसांनी हा कॉल गांभीर्याने न घेता उत्तरवाडे यांच्यावर कारवाई केली. आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. ३२ वर्षीय आयएएस अधिका-याच्या वर्तनाची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि गृह विभागाच्या एका वरिष्ठ कर्मचा-याशी संपर्क साधला, असे अधिका-याने सांगितले.

गृह विभागाच्या अधिका-याच्या सांगण्यावरून डीसीपी पानसरे यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यामार्फत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दोन पानी अहवाल पाठवला. सुजाता यांच्याकडे गृहखात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. गेल्या काही काळात केलेल्या गैरप्रकारांमुळे पूजा खेडकर चर्चेत आली असून दररोज तिचे नवे नवे कारणामे समोर येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR