नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने हा सन्मान जाहीर केला. कर्पुरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. साधारणपणे केंद्र सरकार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कधी पद्म पुरस्कार तर कधी भारतरत्न जाहीर करते. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या २ दिवस आधी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. २४ जानेवारी रोजी कर्पूरी ठाकूर यांची जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्याची घोषणा केली.
कर्पुरी ठाकूर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जननायक म्हटले गेले. कर्पुरी ठाकूर यांचा जन्म आताच्या कर्पूरग्राम येथे झाला होता. त्यांचे वडील गावातील अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायात त्यांनी न्हावी म्हणून काम केले. भारत छोडो आंदोलनात त्यांनी २६ महिने तुरुंगात घालवले. २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या काळात त्यांनी दोनदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. कर्पुरी ठाकूर यांनी १९७७ मध्ये बिहारमधील सर्वात ज्येष्ठ नेते सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्याकडून नेतेपदासाठी निवडणूक जिंकली आणि दोनदा राज्याचे मुख्यमंत्री बनले.
लालू, नितीशकुमार यांचे राजकीय गुरू
जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया हे त्यांचे राजकीय गुरू होते आणि रामसेवक यादव आणि मधू लिमयेंसारखे दिग्गज साथीदार त्यांच्या सोबत होते. लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, रामविलास पासवान आणि सुशील कुमार मोदी यांचे ते राजकीय गुरू होते.