नवी दिल्ली : हॉकी इंडियाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा स्टार गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने परिधान केलेली १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची घोषणा हॉकी इंडियाकडून करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस गेम्समध्ये भारताला सलग दुसरे ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या श्रीजेशच्या निवृत्तीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीजेशच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी श्रीजेशची जर्सी निवृत्तीची घोषणा आज केली. यापुर्वी ३६ वर्षीय श्रीजेशची ज्युनियर राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, जिथे त्याच्यावर भारतीय गोलरक्षकांच्या पुढील पिढीला तयार करण्यासाठी जबाबदार असेल. दरम्यान, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, १६ क्रमांकाची जर्सी आता फक्त ज्युनियर संघात राहील आणि श्रीजेश पुढील श्रीजेश तयार करेल जो ही जर्सी परिधान करेल.
श्रीजेशने २००६ मध्ये केले होते पदार्पण
दरम्यान, केरळच्या एनार्कुलम येथे जन्मलेल्या पीआर श्रीजेशने २००६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदार्पण केले होते. या १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पीआर श्रीजेशला ४ वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने २ वेळा पदके जिंकण्यात मोलाची कामगिरी केली. याशिवाय त्याने भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. हॉकीमधील योगदानाबद्दल पीआर श्रीजेश यांना २०२१ मध्ये भारत सरकारकडून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.