सोलापूर : महापालिकेच्या भोगाव येथील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. गोळा केल्या जाणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट न लावता सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या प्रकरणात महापालिकेचे उपायुक्त, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आणि महापालिकेच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांचा हात आहे. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाची चौकशी करावी, या मागण्यांसाठी आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
प्रहार संघटनेचे शहरप्रमुख अजित कुलकर्णी, डॉक्टर मेडिकल खासगी हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप आडके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या प्रकरणात आरोप केले आहेत. भोगाव येथील कचरा डेपोमध्ये बायोमेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणात सडत आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होत आहे. कोविड काळात २०० टन साठवून ठेवलेला कचरा गाडून टाकला आहे. त्याचे विघटन होऊन तो पाण्यामध्ये मिसळण्याची शक्यता आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वी पाहणी केली. या ठिकाणी शेकडो टन कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नसल्याचे त्यांच्या पाहणीत उघड झाले. या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत, त्या अधिकाऱ्यांना या संदर्भात खुलासा विचारण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.बायोमेडीकल वेस्ट घोटाळ्यात मनपा उपायुक्त आशीष लोकरे, तत्कालीन आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी निखील मोरे जबाबदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कल्पना देऊनही कारवाई केली जात नाही.असे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगीतले.