मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे. आठ मतदारसंघांत एकूण २० उमेदवार रिंगणात असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीची दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज अंतिम करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यातील पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ २०३ उमेदवार आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात उरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात पात्र उमेदवार पंचवीस होते. त्यामधील चार उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २१ उमेदवार रिंगणात आहेत. अकोला मतदारसंघामध्ये पात्र उमेदवार सतरा होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता पंधरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ५६ उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ३६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार होते, त्यापैकी २ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली मतदारसंघात ४८ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी १५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३३ उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात ६६ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतल्याने फक्त २३ उमेदवार रिंगणात आहेत. परभणीत ४१ उमेदवार पात्र झाले होते त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ३४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राजकीय बैठक घेतल्याची तक्रार निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारी संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खुलासा करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
आचारसंहिता कायद्याअंतर्गत कारवाई
आचारसंहिता कायद्यांतर्गत राज्यात ३८ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर, २४ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. २०७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, ५५ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आल्याची माहिती चोकलिंगम यांनी दिली आहे.