22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनियमबाहय काम करण्यासाठी मंत्र्यांचा दबाव

नियमबाहय काम करण्यासाठी मंत्र्यांचा दबाव

निलंबित आरोग्य अधिका-याच्या पत्राने खळबळ विरोधक एकवटले

पुणे : माझ्याविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही हेतूपुरस्परपणे त्रास देण्याच्या आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्यांच्या दबावामुळे निलंबन झाले आहे. या निलंबनामुळे माझे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे. माझे म्हणणे न ऐकून घेता निलंबन करून माझ्यावर अन्याय झाला असून हे निलंबन मागे घ्यावे यासाठी निलंबित सरकारी अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

डॉ. भगवान पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी म्हणून एकूण सेवा ३० वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे १३ वर्षे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. माझे गत ५ वर्षातील गोपनिय अभिलेख अत्युत्कृष्ठ असून वरिष्ठ अधिकारी यांची कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोविड १९ च्या काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. विविध कामकाजाबाबत माझा आयुक्त, आरोग्य सेवा, पुणे जिल्हाधिकारी, पालकमंत्री पुणे, सातारा यांच्यामार्फत वेळोवेळी सत्कार केलेला आहे. सद्यस्थितीत मी पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून १३ मार्च २०२३ पासून कार्यरत होतो.

याठिकाणी माझ्या कामाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही. पुणे महापालिका आयुक्तांनीही माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरीही शासनाकडून माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत ते मला २४ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता मिळाले असे त्यांनी पत्रात सांगितले आहे यावरून आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत.

मॅटमध्ये दावा दाखल
मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरू केली होती. पुणे महापालिका आरोग्य अधिकारी हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरूद्धच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने २९ एप्रिल २०२४ रोजी चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करून मला निलंबित करण्यात आले आहे असंही अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी पत्रात लिहून मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निलंबन आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.

रोहित पवारांचा मंत्री तानाजी सावंतांवर आरोप
आमदार रोहित पवार यांनी या पत्राचा संदर्भ देत मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. आरोग्य विभागात अ‍ॅम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणा-या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिका-यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केली. नियमबा टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अ‍ॅम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटींची दलाली
आरोग्य विभागात अ‍ॅम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणा-या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिका-यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केली आहे. नियमबा टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिका-यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR