यवतमाळ : जेव्हा शेतक-यांकडे कापूस शिल्लक असताना कापसाचे दर ७ हजारांच्या आत होते आणि आता शेतक-यांकडे कापूस शिल्लक नसताना कापसाचे दर ८ हजारांच्या घरात गेले असल्याने शेतक-यांमध्ये तीव्र संतापाची लाट आली आहे.
काही महिन्यांपासून खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाचे भाव ६ हजार ८०० च्या आसपास राहिले होते. मागील महिन्यापर्यंत कापसाचे भाव वाढण्याचे संकेत नव्हते. त्यामुळे अनेक शेतक-यांनी नाईलाजास्तव तीन ते चार महिन्यांपासून साठवलेला कापूस विकला. त्यानंतर मात्र कापसाचे भाव एक हजारांपेक्षा जास्त वाढले आहेत. या भाववाढीचा फायदा शेतक-यांना कमी आणि व्यापा-यांनाच अधिक होणार असल्याने शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वणी तालुक्यात सुरुवातीपासून खासगी खरेदी केंद्रांत कापसाचा भाव ६ हजार ५०० रुपयांपासून ७ हजारांपर्यंत कायम राहिला, तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७ हजार ४०० पर्यंत भाव होता. अतिवृष्टी, विविध किडींचा प्रादुर्भाव, अशा अनेक संकटांवर मात करून हाती आलेल्या कापसाला बाजारात मिळालेला भाव व त्यानंतर सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी लागणारी ऑनलाइन प्रक्रिया अशा अनेक कारणांमुळे शेतक-यांनी घरात साठवलेला कापूस सीसीआय केंद्रांवर विक्रीसाठी मोठ्या रांगा दिसून आल्या.
वाढीव दराचा व्यापा-यांना फायदा
खासगी बाजारातही शेतक-यांनी त्यांच्या गरजेनुसार मिळेल त्या भावात, काही ठिकाणी उधारीवर, उसनवारीवर तसेच शेतीखर्चासाठी लागणा-या बी-बियाणे व खतांच्या खर्चापायी विकला असे चित्र असताना आता कापूस शिल्लक नसताना कापसाच्या भावात ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. परंतु, याचा फायदा शेतक-यांऐवजी व्यापा-यांनाच अधिक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना आहे.