नवी मुंबई : थंडीचा हंगाम सुरू असून, राज्यभर गारवा जाणवत असल्याने भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आणि इतर राज्यांतूनही घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. ताज्या भाज्या मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने भाज्यांच्या घाऊक दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात घसरण झाली असून ग्राहकांना स्वस्त आणि मस्त भाज्या उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गृहिणींना आनंद झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारात भाज्यांच्या दररोज सरासरी ६५० गाड्या येत आहेत. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक जास्त आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर अगदी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो असे आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ४० ते ५० रुपये प्रतिकिलो या दराने मिळत आहेत. केवळ शेवग्याच्या शेंगा घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो आहेत.
किरकोळ बाजारात त्यांचे दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असे आहेत. टोमॅटोचे दर पुन्हा २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. पुढचा महिनाभर तरी हे दर खालीच असणार असल्याचा अंदाज व्यापा-यांनी वर्तवला आहे.
सध्या गुजरात, कर्नाटक, राजस्थानमधूनही भाज्यांची आवक वाढली आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत.