नवी दिल्ली : परीक्षेच्या तीव्र स्पर्धेचे विष कौटुंबिक वातावरणातच पेरले जाते. घरातच दोन भावा-बहिणींमध्ये स्पर्धेची भावना पालक निर्माण करतात. पालकांनो मुलांच्या रिपोर्ट कार्डला ‘व्हिजिटिंग कार्ड’ बनवू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालकांना दिला आहे. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही प्रकारचा दबाव सहन करण्यास सक्षम बनले पाहिजे, असाही कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ केली. हा कार्यक्रम दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा केली. बोर्ड परीक्षेपूर्वी तणाव आणि भीती कमी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.
२.२६ कोटी शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ साठी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सुमारे ३ हजार सहभागींनी पंतप्रधानांशी संवाद साधला.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक आणि कला महोत्सवातील विजेत्यांना मुख्य कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. भारत मंडपममध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी तणाव व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन आणि स्थानिक खेळण्यांचे प्रदर्शन मांडले होते. त्यात पारंपरिक खेळण्यांचेही प्रदर्शन होते. मोदींनी या प्रदर्शनाची पाहणी केली. त्यांनी या ‘ विलक्षण प्रदर्शन’ साठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.