35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूरदररोज ९५० लिटर ऑक्सिजनची निर्मिती

दररोज ९५० लिटर ऑक्सिजनची निर्मिती

लातूर : प्रतिनिधी

कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन-१ चा प्रसार देशातील काही राज्यांमध्ये होत असतानाच आता जेएन-१ चा मराठवाड्यात शिरकाव झाला आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील धाराशिव व बीड जिल्ह्यांत जेएन-१ चे रुग्ण आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ऑक्सिजन बेड, औषधी व अन्य यंत्रसामुग्री सज्ज करण्यात आली आहे. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तयार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयात ६७ केएल ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. या शिवाय रुग्णालयात दररोज ९५० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे.

चार वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट लातूर जिल्ह्यात येऊन धडकली. त्या वेळी कोरोना काय असतो? या पासून ते त्या वरील उपायापर्यंतच्या सर्वच गोष्टी अनभिज्ञ होत्या. जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे कोरोनाशी लढा देण्याची यंत्रणा उभी राहात गेली. लातूर जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात त्रासदायक ठरली. दुस-या लाटेने मात्र जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. पाहता पाहता संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या दुस-या लाटेच्या कवेत गेला होता. आरोग्य यंत्रणेने उभी केलेली व्यवस्था तोकडी पडली होती. अशा परिस्थितीत धैर्याने आणि संयमाने सर्वच यंत्रणांनी दिवस-रात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात स्वत:ला झोकून दिले होते.

लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात १० केएल, १० केएल व ६ केएल असे ३ लिक्विड ऑक्सिजन प्लँट, २०० एलपीएमचा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार प्लँट, लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयाच्या परिसरात २०० एलपीएमचा प्लँट असे ५ प्लँट उभे करण्यात आले. या शिवाय मुरूड येथे १०० एलपीएम, अहमदपूर येथे ५०० एलपीएम, अहमदपूर येथे ३०० एलपीएम, निलंगा येथे ६०० एलपीएम, उदगीर येथे ६०० एलपीएम व १४ केएल आणि निलंगा येथे २० केएल असे एकूण ७ प्लँट उभारण्यात आले. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे शासनाचे एकुण १२ प्लँटस आहेत. हे त्या काळातच उभे राहिलेले आहेत.

मागचा कोरोनाचा काळ सर्वांसाठीच खूप कठीण गेला. आता नवीन व्हेरियंट जेएन-१ चे रुग्ण काही भागात आढळले आहेत त्यामुळे राज्य शासनाकडून सर्व आरोग्य संस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंत्रसामुग्री तयार ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक क्षमतेसह औषधी आणि अन्य बाबी तयार केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट मागच्या काळात सुरू झाले आहेत. यामुळे पूर्वीसारखी कोरोना परिस्थिती उद्भवली तरी आता ऑक्सिजन टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे.

माजी मंत्री अमित देशमुख यांच्यामुळेच लातूर जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण
कोविड-१९ च्या संसर्गाने संपूर्ण लातूर जिल्ह्यात कठीण परिस्थिती निर्मााण झाली होती. रुग्णास साधा बेड मिळण्याची परिस्थिती नव्हती तिथे ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटर बेड मिळणे तर शक्यच नव्हते. अशा परिस्थितीत राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सातत्याने आरोग्य यंत्रणेशी संपर्कात राहून जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठका घेऊन लातूर जिल्ह्यात नॉर्मल बेड, ऑक्सिजन बेड, आसीयु बेड, ऑक्सिजन मिर्मिती प्लँट यासाठी आवश्यक ती मदत, निधी, यंत्रणा उभी करून दिली. परिणामी आज लातूर जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR