नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केल्याची माहिती पुढे येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने जप्त केलेली मालमत्ता जनतेला मिळावी, यासाठी आम्ही काम करत आहोत, असे मोदी म्हणाल्याचे पश्चिम बंगालच्या भाजप पदाधिका-यांनी स्पष्ट केले.
कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँगेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील भाजप उमेदवार अमृता रॉय रिंगणात आहेत. रॉय यांच्यासोबत टेलिफोनवरील संभाषणात नरेंद्र मोदींनी हा मुद्दा मांडला.
अमृता रॉय पूर्वाश्रमीच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. त्यांच्याशी बोलताना मोदी म्हणाले की, मी सध्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहे. ईडीने पश्चिम बंगालमध्ये ३ हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा पैसा गरीबांचा आहे. कुणी शिक्षक बनण्यासाठी पैसे दिले, तर कुणी क्लार्क बनण्यासाठी पैसे दिले. मी सध्या यासंदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास करत असून माझी इच्छा आहे की, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कायदेशीर तोडगा काढला जाईल आणि नियम बनवला जाईल.
पंतप्रधान मोदी आणि रॉय यांच्यात झालेल्या संवादाचे विवरण देताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधानांचा अंदाज असा आहे, लाचेच्या स्वरुपात दिलेली रक्कम ही तीन हजार कोटी आहे. याबाबत लोकांना जागरुक करुन सत्तेत आल्यानंतर तातडीने हे पैसे देण्यासाठी मार्ग शोधला जाणार आहे. ‘एबीपी न्यूज’ने हे वृत्त दिले आहे.