नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशातील अनेक राज्यांसह बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा केलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी ४० हजार कोटींची तरतूद केली. परंतु महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातला विशेष काहीही निधी मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बजेटवरून दुजाभाव झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिकडे दिल्लीमध्ये महाविकास आघाडीचे खासदार संतप्त झाले असून संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राला जगातले आर्थिक केंद्र करण्याचा संकल्प केला होता. मात्र अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि मुंबईच्या वाट्याला काहीही मिळाले नसल्याने खासदार आक्रमक झाले आहेत.
मुंबईसाठी काहीच नाही
मुंबईसाठी बजेटमध्ये विशेष काहीच दिले नाही, महाराष्ट्रकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे खासदार आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु झाले आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आंदोलनात सहभागी झाले आहे.
केंद्रासोबत असणा-यांनाच दिले
महाविकास आघाडीच्या खासदारांनी मोदी सरकार हाय..हाय.. अशा घोषणा दिल्या. वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी खासदार यावेळी उपस्थित होते. जे राज्य केंद्रासोबत आहेत, त्यांना भरघोस मिळाले आणि जे विरोधात आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला, असा विरोधी गटाचा आरोप आहे.