परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी परभणी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तहसीलदार, नायब तहसीलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ग्रेड पे च्या अनुषंगाने तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रीत वर्ग दोन यांचे ग्रेड पे ४८०० करण्याच्या अनुषंगाने वेतन त्रुटी समिती बक्षी समिती समक्ष केलेल्या सादरीकरणात नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने तसेच यापूर्वी शासनास देण्यात आलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई करून सदरची मागणी मान्य करून त्या संदभार्तील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, श्रीराम बेंडे, शारदा चोंडेकर, दिनेश झांपले, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, लक्ष्मीकांत खळीकर, गजानन इनामदार, विजय मोरे, पंढरीनाथ शिंदे, सोपान ठोंबरे, प्रशांत वाकोडकर, व्ही. डी. महाजन, सुग्रीव मुंढे, विनोद पवार आदी तहसीलदार, नायब तहसीलदार एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.