26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक

नागपूरमध्ये पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात

नागपूर: वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला आहे. नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी भारत माता की जय, जय विदर्भच्या घोषणा दिल्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ऍड. वामनराव चटप व इतर कार्यकर्ते बुधवारपासून (ता.२७) नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तसेच ऍड. सुरेश वानखेडे व मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्हा कार्यालयासमोरसुद्धा ऍड. चटप यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू आहे. सतत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरीही सरकारला जाग न आल्याने आणि ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम उलटल्याने नागपूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले. रविवारी वणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये प्रा. पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब राजूरकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, अजय धोबे, नामदेव जनेकर, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकर, होमदेव कणाके, देवा बोबडे, कला क्षीरसागर, धीरज भोयर, दिनेश रायपूरे, राकेश वराटे आदींसह असंख्य विदर्भवादी सहभागी झाले होते.

सोमवारी संविधान चौकामध्ये बराच राडा झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेलं. आंदोलकांनी रस्त्यारच ठिय्या मांडला होता. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा मुद्दा पेटलेला असून सरकार हा प्रश्न कसा सोडवणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR