सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही तासातच राजकीय संबंधित तसेच इतर हजारो पोस्टर्स हटविले. आचारसंहिता भंगची तक्रार दाखल होताच अवघ्या काही मिनिटात अधिकाऱ्यांनी स्पॉटवर पोहोचून कारवाई केली.
अकरा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज १२ ते १४ तास काम अन् मतदान जनजागृती केल्यानं यंदा ३ टक्क्यांनी मतदान वाढले. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाने कौतुक केले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे.
२०१९ साली ६४.५९ टक्के मतदान झाले. यंदा ६७.७२ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानात यंदा ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. विधानसभेला एकूण ११ विधानसभा मतदारसंघात ३७३८ मतदान केंद्रे होती. या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती केलेली होती. मतदाराला मतदान केंद्रावर येऊन सहज मतदान करता येईल, या पद्धतीने मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली होती.
काही मिनिटांत मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यास मदत झाली. एकूण मतदान केंद्राच्या जवळपास ६० टक्के म्हणजेच २३०५ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सी-व्हिजिल कक्षात निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीवर कक्षाच्या वतीने वेळेत तक्रारी संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याचा निपटारा करण्यात आला.
मतदारांच्या आरोग्याचीही काळजी मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उद्भवली तर त्यावेळेस त्यांच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच अॅम्ब्युलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही प्रकारचा तणाव हा कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही.
ज्या अधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिली, ती त्यांनी अचूकपणे पार पडली. नियंत्रण कक्षातून आम्ही मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून होतो. मतदान केंद्रावर अचानक संपर्क तुटला किंवा तत्काळ संपर्क होत नसल्यास आम्ही समांतर ग्राम संपर्क यंत्रणा उभारली होती. सुदैवाने असे कुठेच घडले नाही. सर्व मतदान केंद्र संपर्कात होते. ३ टक्के मतदान वाढल्याने निवडणूक आयोगाकडून सोलापुरातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक झाले. असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगीतले.