परभणी : सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे व मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या परिवाराला प्रत्येकी एक कोटी रूपये अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला कायम स्वरूपी शासकीय नोकरीत समावून घेण्याच्या मागणीसाठी वंचिज बहुजन आघाडीतर्फे गुरूवार दि. ३० जानेवारी रोजी परभणी शहरात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शनिवार बाजार येथून निघालेल्या या मोर्चात संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सुर्यवंशी यांच्यासह उपस्थितांनी सरकारने अद्याप कुठलीही ठोस कारवाई न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणा-या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. पोलिसांनी केलेल्या कारवाईत जखमी झालेल्यांना तातडीने २५ लाखांची मदत द्यावी. संविधान शिल्पाची विटंबना करणा-या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. युवक सुरज जाधव यांच्या मारेक-याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. संतोष पाईकराव यांच्या मारेक-यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी आदी मागन्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
परभणी शहरातील शनिवार बाजार येथून या जन आक्रोश मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौक, गांधी पार्क या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांसह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह संविधान प्रेमी नाग्रिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात सहभागी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता.
आत्महत्येनंतरच सरकार दखल घेईल : विजयाबाई सुर्यवंशी
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पर्यंत आम्हाला न्याय भेटला नाही. जोपर्यंत सोमनाथ यांच्या प्रकरणात न्याय मिळणार नाही तो पर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तसेच वेळ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी माझा जीव देखील देईल. मी जीव दिल्यानंतरच सरकार माझी दखल घेईल अशी खंत सोमनाथ यांच्या मातोश्री विजयाबाई सुर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे.