नागपूर : शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या उद्देशाने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अधिकच्या चर्चेसाठी संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय झाला असून समितीच्या अध्यक्षपदी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकासाठी दोन्ही सभागृहातील मिळून २१ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विधान परिषदेच्या उमा खापरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमित गोरखे, सतेज पाटील यांच्यासह विधानसभेतील रणधीर सावरकर, सिद्धार्थ शिरोळे, राजेश पाडवी, मनीषा चौधरी, मंगेश कुडाळकर, अनिल पाटील, भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले आदींचा समावेश आहे.