नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. परंतु दोन पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे पक्षचिन्हावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावरून आता सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला येत्या ३६ तासांत अस्वीकरण पत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले की, ३६ तासांच्या आत मराठी दैनिकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल. घड्याळ चिन्हाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, निवडणुकीच्या काळात न्यायप्रविष्ट असलेले घड्याळ चिन्ह वापरले जात आहे, असे या अस्वीकरण पत्रकात असेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना अजित पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी १९ मार्च आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व प्रचार सामग्रीमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर खटल्याच्या निकालाच्या अधीन असल्याचे अस्वीकरण समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. शेवटच्या सुनावणीत (२४ ऑक्टोबर) न्यायालयाने अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीसाठीही पूर्वीचे आदेश पाळले जातील, असे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढे खंडपीठाने तोंडी इशारा दिला की जर त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केले गेले तर कारवाई केली जाईल, असे म्हटले.