22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे हिट अँण्ड रन प्रकरण; गृहमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

पुणे हिट अँण्ड रन प्रकरण; गृहमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांशी या प्रकरणी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेत फडणवीसांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी देखील त्याविरोधात अपील दाखल करण्याच्या सूचना फडणवीसांनी यावेळी पोलिसांना दिल्या आहेत. तर या आरोपीला कोणती विशेष ट्रीटमेंट दिली असल्यास त्यावेळी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असतील तर, तात्काळ संबधितांवर निलंबनाची कारवाई करा अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत.

पोलिसांनी याप्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलावर ३०४ चा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवताना मद्यप्राशन केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आरोपीला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता त्या अल्पवयीन आरोपीचा पबमधला व्हीडीओ समोर आला आहे.

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील, त्याला दारु देणा-या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करुन दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन असूनदेखील त्याला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील आणि त्याला दारु देणा-या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातामध्ये अनिष अवधिया (वय २४, रा. पाली, मध्यप्रदेश) आणि सहप्रवासी अश्विनी कोस्टा (वय २४, रा. जबलपूर, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मोटर चालकास (वय १७ वर्षे आठ महिने) येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मोटारचालक हा एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. मोटारचालक तरुणाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७. मोटार वाहन अधिनियम कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात, अल्पवयीन मुलाने ऍड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली. मुलाविरोधात लावण्यात आलेले कलम जामीनपात्र आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. तो न्यायालयांच्या तारखेला हजर राहील तसेच तपासास सहकार्य करेल, असा युक्तिवाद अ‍ॅड. पाटील यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुलाचा जामीन अर्ज मंजूर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR