शाहजहांपूर : हावडाहून अमृतसरला जाणा-या १३००६ पंजाब मेल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात आग लागल्याच्या अफवेने चेंगराचेंगरी झाली. काही प्रवाशांनी घाईघाईत ट्रेनमधून खाली उड्या मारल्याने सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सात जण गंभीर जखमी असून, त्यांना शाहजहांपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास बरेली आणि मिराणपूर कटरा स्थानकादरम्यान ट्रेनच्या जनरल डब्यात आग लागल्याच्या अफवेवरून चालकाने ट्रेन थांबवली. ट्रेनचे अर्धे डबे नदीच्या पुलावर होते आणि अर्धे बाहेर होते. ट्रेन थांबताच प्रवाशांनी खाली उड्या मारायला सुरुवात केली. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. यानंतर अनेक डबे रिकामे झाल्यानंतर, ड्रायव्हर आणि गार्डने रेल्वे डबे तपासले असता सर्व काही ठीक असल्याचे आढळले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुरादाबाद रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य गुप्ता यांनी सांगितले की, बिलपूरजवळ सकाळी काही खोडकर घटकांनी ट्रेन क्रमांक १३००६ च्या जनरल जीएस कोचमध्ये ठेवलेल्या अग्निशामक यंत्राचा वापर केला, ज्यामुळे ट्रेन थांबवण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी उड्या मारायला सुरुवात केली. जखमींवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. उपद्रवी घटकांची ओळख पटविण्यासाठी तपास करण्यात येत आहे, असेही गुप्ता म्हणाले.