मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा निवडणूक लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. २०२० मध्ये युक्रेनविरुद्ध झालेल्या युद्धात सहभागी झालेल्यांच्या सन्मानार्थ शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. या घोषणेनंतर बरोबर एक दिवसानंतर रशियामधील निवडणूक अधिका-यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक १५-१७ मार्च २०२४ निर्धारित केली आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या ७१ वर्षांचे आहेत. रशियामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. रशियाच्या मीडियावरही व्लादिमीर पुतिन यांची पूर्ण नजर आहे. व्लादिमीर पुतिन यांना आव्हान देणारे त्यांचे बहुतांश प्रतिस्पर्धी हे सध्या तुरुंगात आहेत किंवा त्यातील काहींनी देशाबाहेर पलायन केले आहे. विशेष म्हणजे, व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करणारी स्वतंत्र माध्यमव्यवस्था देखील रशियात शिल्लक राहिलेली नाही. ब-याच वर्षांपासून ते सत्तेत आहेत. यापूर्वी २०००-२००८ पर्यंत व्लादिमीर पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१२ पासून ते आतापर्यंत व्लादिमीर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत.
रशियाच्या राज्यघटनेत २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ चारवरून सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे व्लादिमीर पुतिन यांना कोणत्याही मुदतीच्या मर्यादेशिवाय पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहणे सोपे झाले आहे. मार्च २०२४ च्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन जिंकले तर २०३० पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहतील. याशिवाय, त्यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना २०३६ पर्यंत सहा वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो.
व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी क्रेमलिन पुरस्कार सोहळ्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाचा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. क्रेमलिनचे अधिकृत प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन हे नेते राहावेत यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. युद्धात पराक्रम गाजवणा-या अनेक ज्येष्ठ लष्करी अधिका-यांनी व्लादिमीर पुतिन यांना ही निवडणूक लढवण्याची विनंती केली. या अधिका-यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना व्लादिमीर पुतिन यांनी उत्स्फूर्तपणे होकार दिल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.