25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या भाषणावर प्रश्नचिन्हे

मोदींच्या भाषणावर प्रश्नचिन्हे

आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार भाषणात नवीन काहीच नाही, काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. पण, अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान मोदींकडे देण्यासारखे नवीन काहीच नाही. नेहेमीप्रमाणे ते दुस-याच मुद्यावर लोकांचे लक्ष नेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली.

जयराम रमेश आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांचा वैयक्तिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या दणदणीत पराभवाला झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आज संसदेबाहेरुन देशाला संदेश दिला, पण यात नवीन काहीही नव्हते. त्यांच्या बोलण्यातून त्यांना जनादेशचा अर्थ समजला नसल्याचे दिसून येते. त्यांचा वाराणसीत कमी फरकाने विजय झाला, त्यामुळे त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. इंडिया आघाडी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचा हिशेब मागणार आणि त्यांचा खरा चेहरा समोर आणणार अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षांची टीका
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे पीएम मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील, अशी देशाला आशा होती. नीट आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील, अशी आशा होती. पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले. मणिपूर गेल्या १३ महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे, पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही. आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते, रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना, अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
अधिवेशनापूर्वी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. लोकांना विरोधकांकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. विरोधक आपली भूमिका बजावतील आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे. यावेळी त्यांनी २५ जून रोजी आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आणि याला भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग म्हटले.

देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक
जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिस-यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR