नवी दिल्ली :
क्रिडा विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू, फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या गाबा कसोटीनंतर अश्विनने ही सर्वात मोठी घोषणा केल्याने क्रिडा विश्वात खळबळ उडाली आहे. आजचा क्रिकेटचा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या दौ-यात त्याला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
अॅडलेडनंतर तो गाबा कसोटीतून बाहेर पडला. गाबा टेस्ट दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीरशीही बराच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. आपल्या क्रिकेट कारकिर्दित त्याने गोलंदाज म्हणून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या कसोटी सामन्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. या पत्रकार परिषदेत अश्विनसोबत कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. अश्विनची कारकीर्द चमकदार आहे. त्याने कसोटीत ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच ३५०३ धावाही केल्या आहेत. अश्विनने वनडे आणि टी-२०मध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवत जबरदस्त कामगिरी केली आहे. आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने टी २० मध्ये ७२ विकेट घेतल्यात.