वेलिंग्टन : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा २०२४ क्रिकेट पुरस्कार सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्यात २०२३-२४ हंगामात शानदार कामगिरी करणा-या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात आला.
२४ वर्षीय क्रिकेटपटू रचिन रविंद्रने न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात मोठा पुरस्कार ज्ािंकला आहे. त्याला या हंगामातील न्यूझीलंडचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा सर रिचर्ड हॅडली मेडल मिळाले आहे.
त्याने २०२३-२४ हंगामात तिन्ही क्रिकेट प्रकारात शानदार कामगिरी केली होती. २०२३ वन-डे वर्ल्डकपमध्येही तो चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ५७८ धावा या स्पर्धेत केल्या होत्या.
एमेलिया सर्वोत्तम महिला क्रिकेटर
एमेलिया केर न्यूझीलंडची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिला डेबी हॉकली मेडल मिळाले. इतकेच नाही, तर ती न्यूझीलंडची सर्वोत्तम महिला वनडे आणि महिला टी-२० क्रिकेटपटूही ठरली.
अष्टपैलू केरने या हंगामात वनडेत ६७ च्या सरासरीने ५४१ धावा केल्या. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ती या हंगामात सर्वाधक विकेट्स घेणारी न्यूझीलंडची क्रिकेटपटू ठरली. तिने २५२ धावा केल्या आहेत.