28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड पालकमंत्रिपदावरून राडा

रायगड पालकमंत्रिपदावरून राडा

मुंबई-गोवा महामार्ग गोगावले समर्थकांनी रोखला

मुंबई : प्रतिनिधी
रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुंदोपसुंदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून सुरू होती. आता पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले रायगड पालकमंत्रिपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे शनिवारी रात्री शिंदे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी गोगावलेंचा जयघोष करत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा निषेध केला. गोगावले समर्थक कार्यकर्त्यांनी जवळपास दोन तास रस्ता रोखून धरला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत रस्ता मोकळा केला. शिवसैनिकांना बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. अजूनही या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

भरतशेठ गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मागील कार्यकाळात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे सांगितले गेले, मात्र महायुती सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला पण गोगावलेंना मंत्रिपद मिळाले नाही. अखेर सरकारचा कार्यकाळ संपत असताना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. महायुती सरकारच्या दुस-या कार्यकाळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. आता रायगडचे पालकमंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांना होता. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्या पदरात पालकमंत्रिपद पडले. सुनील तटकरेंनी गोगावलेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या संतप्त भावना शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहेत.

भरतशेठ गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर भरत शेठ गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय धक्कादायक आहे. अशी अपेक्षा कोणीही केलेली नव्हती. पक्षातील नेत्यांसोबत तसेच महायुतीच्या दिग्गजांसोबत अजून चर्चा झालेली नाही. जिल्ह्यातील सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील वातावरणाची माहिती दिली होती. आता जो निर्णय दिला आहे तो अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे. मात्र आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असेही भरत गोगावले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR