मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील जोगेश्वरीमध्ये अनधिकृत घरांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. झोपडपट्टीधारकांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीमध्ये पाच पोलिस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी २०-२५ पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
जोगेश्वरी परिसरात अनधिकृत घरांवर रेल्वे प्रशासनाची तोडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता रेल्वेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान झोपडपट्टीधारकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत २० ते २५ जणांना ताब्यात घेतले आहे.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल
आंदोलकांवर दगडफेकीचा आणि परवानगी नसताना आंदोलन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जोगेश्वरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक रहिवाशांचा कडाडून विरोध
रेल्वे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना यापूर्वीच ‘अनधिकृत बांधकाम’ हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वारंवार नोटिसा पाठवून देखील अनधिकृत बांधकाम नागरिकांकडून न हटवण्यात आल्याने पोलिसांच्या मदतीन्े पालिकेने ही कारवाई करण्याचे ठरवले. पालिकेची कारवाई सुरू असतानाच येथे मोठा जमाव दाखल झाला. त्याचवेळी या जमावातून दगडफेकीला सुरुवात झाली.