22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रइंडिया आघाडीकडून राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार

इंडिया आघाडीकडून राहुल गांधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी
देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ०४ जून रोजी जाहीर होणार आहे. आज शनिवारी (ता. ०१ जून) देशात शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून आता सर्वांना ०४ जूनची प्रतीक्षा आहे. एकीकडे एनडीएकडून पुन्हा एकदा म्हणजेच तिस-यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना आता इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतर आता खासदार राऊतांनीही यावर शिक्कामोर्तब करत आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत उभे आहोत, असे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

इंडिया आघाडी लोकसभा निवडणूक जिंकली तर इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हे माझी पहिली पसंत असतील, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. खरगेंच्या या विधानाबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, इंडिया आघाडी जिंकली तर नाही, ती जिंकणारच आहे. ०४ जून रोजी १२ नंतर सर्वांना इंडिया आघाडी जिंकत आहे, असेच कळेल. ज्याप्रमाणे खरगेंनी सांगितले की, त्यांची पसंत राहुल गांधी आहेत, पण मी सांगेन की संपूर्ण देशाची पहिली पसंत राहुल गांधीच आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्यासोबत उभे राहू, असे म्हणत राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR